
षष्ठाध्यायीं ऐसी कथा | बंकटलालें सद्गुरुनाथा |
मक्याचीं कणसें खाण्याकरितां | नेलें आपुल्या मळ्यांत ||
गांधीलमाशा उठल्या तेथ | लोक होऊन भयभीत |
पळूं लागले असती सत्य | जीव आपुला घेऊनी ||
बाधा गांधीलमाश्यांची | महाराजा न झाली साची |
घेतली असे शिष्यत्वाची | परीक्षा बंकटलालाची ||
नरसिंगजीस भेटण्याला | स्वामी गेले अकोटाला |
जो नरसिंगजी होता भला | शिष्य कोतशा अल्लीचा ||
कांहीं दिवस राहिले | अकोटामाजीं भले |
नरसिंगजीसी हितगुज केलें | बंधु आपुला म्हणून ||
चंद्रभागेच्या तीरीं | शिवरग्रामाभीतरीं |
कृपा व्रजभूषणावरी | केली असें जाऊन ||
मारुतीच्या मंदिरांत | श्रावणमासाच्या उत्सवांत |
समर्थ आले राहण्याप्रत | येथें षष्ठमाची पूर्तता ||