
कथा एकोणविसाव्यासी | दिला काशीनाथपंतासी | आशीर्वाद तो अतिहर्षी | तो येता दर्शना || गोपाळ मुकिंद बुटी भला | नागपुरासी घेऊन गेला | श्रीगजाननस्वामीला | आपुल्या गेहाकारणें || त्याच्या मनीं ऐसा हेत | महाराज ठेवावें नागपुरांत | परी हरि पाटलांनीं परत | आणिले समर्थ शेगांवीं || धार-कल्याणचे रंगनाथ | साधु आले भेटण्याप्रत | समर्थासी शेगांवांत | ऐसे आणि कितीतरी || श्रीवासुदेवानंद सरस्वती | जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ति | दृष्टादृष्ट होतां नुसती | आनंद झाला उभयतातें || तेव्हां बाळाभाऊला | जो कां होता संशय आला | तो समर्थांनीं निवटिला | करुनियां उपदेश|| केलें खळ्याचें संरक्षण | गाढवाचे पासून | समर्था मारितां आलें मरण | नारायणासी बाळापुरीं || गजाननाचे कृपें भलें | जाखडयाचें लग्न झालें | कपीलधारेसी दिधलें | दर्शन निमोणकराला || तुकारामें आपुला | पुत्र समर्था वाहिला | नारायण नामें भला | सेवा करावयाकारणें || पंढरीतें जाऊन | विठ्ठलातें विचारुन | महाराज आले परतून | शेगांवाकारणें || पुढें भाद्रपदमासासी | ऋषि-पंचमीच्या पुण्य दिवशीं | आधुनिक कालाचा हा ऋषि | समाधिस्त जहाला ||