
शेठ बच्चूलालाची | कथा द्वादशाध्यायीं साची |
मूर्ति निरिच्छपणाची | प्रत्यक्ष होते महाराज ||
स्वामीचें वस्त्र नेसला | पितांबर शिंपी कोंडोलीला |
स्वइच्छेनें येता झाला | परमभक्त होता जो ||
पितांबरानें कोंडोलीसी | बळिरामाच्या शेतासी |
वठलेलिया आंब्यासी | पानें फळें आणविलीं ||
पितांबर राहिला कोंडोलींत | तेथेंच झाला समाधिस्थ |
नवा मठ झाला स्थापित | शेगांवीं समर्थ इच्छेनें ||
विचार करुनी मानसीं | बसून रेतीच्या गाडीसी |
महाराज नव्या मठासी | आले जुन्या मठांतून ||
झ्यामसिंगानें मुंडगांवाला | नेलें गजाननस्वामीला |
पर्जन्यानें घोटाळा | भंडार्याचा केला असे ||
झ्यामसिंगानें आपुली | इस्टेट समर्था अर्पिली |
पुंडलिकाची निमाली | गांठ प्लेगची श्रीकृपें ||